पाकची बनवाबनवी… पॉझिटिव्ह असलेला पाक खेळाडू दुसऱ्या दिवशी निघाला कोरोना निगेटीव्ह


इस्लामाबाद – पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या खेळाडूंची इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीवरुन पाकिस्तानची बनवाबनवी सुरु आहे. शादाब खान, हैदर अली आणि हारीस रौफ असे तीन खेळाडू सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पाकिस्तानच्या आणखी सात खेळाडूंना मंगळवारी आलेल्या अहवालांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. फखर झमान, इमरान खान, काशिफ भट्टी, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वहाब रियाज या खेळाडूंचा यामध्ये समावेश होता. पाक क्रिकेट बोर्डाने या सर्व खेळाडूंना तात्काळ क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या होत्या.

यादरम्यान, स्वतःच्या जबाबदारीवर मोहम्मद हाफीजने केलेल्या कोरोना चाचणीमध्ये तो कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे खेळाडूंच्या कोरोना चाचणीवरुन पाक क्रिकेट बोर्डात सध्या बनवाबनवी सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. यासंदर्भातील माहिती क्रीडाविषयक ESPNCricinfo या संकेतस्थळाने दिली आहे. पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यावरच या सर्व परिस्थितीमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यासाठी २९ जणांच्या संघाची घोषणा केली होती. काही राखीव खेळाडूंनाही ज्यात जागा देण्यात आली होती. सध्या पाक संघात बिलाल आसिफ, इमरान बट, मुसा खान आणि मोहम्मद नवाझ हे राखीव खेळाडू म्हणून आहेत. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी संघ ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्याआधी प्रत्येक खेळाडूला स्वतःची कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment