मच्छिंद्र कांबळींच्या मुलाची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिफारस - Majha Paper

मच्छिंद्र कांबळींच्या मुलाची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिफारस


मुंबई : नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली प्रोडक्शनचे तसेच दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचे पुत्र नवनाथ उर्फ प्रसाद कांबळी यांच्या नावाची विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिफारस करण्यात आली असून सध्या नाट्यपरिषदेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमार्फतच ही शिफारस करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे चर्चा झाली असून, तसे लेखी पत्र देण्यात आल्याचे वृत्त आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुले मागील तीन महिन्यांपासून नाट्यक्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले आहे. रंगमंच कामगारापासून रंगमंच गाजवणाऱ्या कलाकारापर्यंत प्रत्येकजण घरात बसून आहे. अशावेळी नाट्यपरिषदेला राष्ट्रवादी पक्षाने मदत करत निधी दिला. प्रसाद कांबळी यांच्यासह नाट्यपरिषदेचे पदाधिकारी त्याचे आभार मानण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर फंडासंबंधी असलेल्या पत्रकार परिषदेला गेले होते.

त्यावेळी सुनील तटकरे यांची नाट्यपरिषदेचे शरद पोंक्षे, संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, रत्नकांत जगताप आदी मंडळींनी भेट घेऊन विधान परिषदेवर रा्ष्ट्रवादी मार्फत प्रसाद कांबळी यांना संधी देण्याची शिफारस करण्यात आली. याबाबत दिगंबर प्रभू यांनीही दुजोरा दिला. यावर बोलताना दिगंबर प्रभु म्हणाले, नाट्यक्षेत्रातून गेल्या अनेक वर्षापासून एकही चेहरा विधानपरिषदेवर गेलेला नाही. अशावेळी ही चांगली संधी आहे. म्हणूनच प्रसादच्या नावाची शिफारस करण्यात आली.

जेव्हा ही बातचीत सुनील तटकरे यांच्याशी झाली, तेव्हा प्रसाद कांबळी तिथे नसल्याचेही उपस्थितांपैकी एकाने सांगितले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना भेटण्यासाठी त्यावेळी ते बाहेर गेले असताना ही शिफारस झाली. मच्छिंद्र कांबळी यांचे प्रसाद कांबळी हे पुत्र असून मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर भद्रकाली प्रोडक्शनची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आणि प्रयोगशील निर्माता म्हणून आपला लौकिक कमावला. तरूण वयात ते निर्माता संघाचे अध्यक्ष झाले. शिवाय, दोन वर्षांपूर्वी ते नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.

Leave a Comment