कोरोनिलला फक्त खोकला, ताप आणि इम्युनिटी बुस्टरसाठीची परवानगी; उत्तराखंड आयुर्वेद विभागाची माहिती


नवी दिल्ली – योगगुरु रामदेवबाबांच्या पतंजलीकडून कोरोना प्रतिबंधक रामबाण आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा करण्यात आला. पण आता पतंजलीचा हा दावा वादामध्ये अडकला आहे. काल रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना प्रतिबंधक कोरोनिल हे औषध सगळ्यांसमोर आणले होते, त्याचबरोबर हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे योग गुरू बाबा रामदेव यांनी सांगितले होते आहे. पण त्यानंतर आम्ही रिपोर्ट्स पाहून त्याला अनुमती देण्याबाबत निर्णय घेऊ असे आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

त्याच दरम्यान आज उत्तराखंड आयुर्वेद विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने सादर केलेल्या रिपोर्ट्सनुसार खोकला, ताप आणि इम्युनिटी बुस्टरसाठी त्यांनी परवानगी मागितली होती, त्यामध्ये कोरोना व्हायरसचा उल्लेख करण्यात आला नव्हता. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.


उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पतंजली विरुद्ध त्यांनी नोटिस जारी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे त्यांना आम्ही परवानगी दिली आहे. पण त्यामध्ये कोरोना व्हायरस अथवा कोव्हिड 19चा उल्लेख करण्यात आला नव्हता.

दरम्यान आयुर्वेद विभाग पतंजलीला नोटिस पाठवून त्यांना यासंदर्भातील परवानगी कोणी दिली याची विचारणा करणार आहे. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील आधी रिपोर्ट पाहिला जाईल. त्यानंतरच परवानगी दिली जाईल अशी माहिती दिली आहे. तसेच कालपासूनच कोरोनिल, श्वासारी वटी या औषधांच्या जाहिराती आयुष मंत्रालयाकडून थांबवण्यात आल्या होत्या.

Leave a Comment