मनसेच्या दणक्यानंतर ‘टी-सिरीज’ने हटवले आतिफ अस्लमचे गाणे - Majha Paper

मनसेच्या दणक्यानंतर ‘टी-सिरीज’ने हटवले आतिफ अस्लमचे गाणे


मुंबई – मनसेच्या दणक्यानंतर ‘टी-सिरीज’ने जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम याचे गाण युट्यूबवर अपलोड केल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून तात्काळ गाणे हटवण्याची मागणी करत टी-सिरीजचे मालक भूषण कुमार यांना इशारा दिला होता. भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाही, तर तुला खूप महागात पडेल, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी दम भरला होता.


त्यानंतर टी-सिरीजने तात्काळ जाहीर माफी मागत माफी मागणारे पत्र टी-सिरीजकडून पाठवण्यात आलेले असून मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हे गाणे आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केले होते. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणे टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी ग्वाही देतो, अशी हमी टी-सीरिजने दिली आहे. त्यांनी या पत्रात यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची खात्रीही दिली आहे.

भूषण कुमार यांना अमेय खोपकर यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून इशारा दिला होता. सोनू निगम यांनी केलेल्या आरोपानुसार माफियागिरी खपवून घेतली जाणार नाही. केलेले आरोप खरे असतील तर आगामी काळात मागे पुढे पाहणार नाही. आतिफ अस्लम हा पाकिस्तानी गायक असल्यामुळे त्याचे गाणे तात्काळ टी-सिरीजच्या यूट्यूब चॅनलवरून काढून टाका, अशी मागणी त्यांनी केली होती.

Leave a Comment