हज यात्रेसाठी अर्ज केलेल्यांचे सरकारकडून परत मिळणार पैसे


नवी दिल्ली – जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा फटका यंदाच्या हज यात्रेलाही बसला आहे. सौदी अरेबियाने जगभरात कोरोनाबाधितांच्या आकड्यात होत असलेल्या सातत्याने वाढीमुळे परदेशातील मुस्लिम भाविकांसाठी हज यात्रेसाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावर्षीची हज यात्रा भारतीय मुस्लिमांसाठी रद्द झाली असून, सरकारकडून यात्रेला जाण्यासाठी अर्ज केलेल्यांना पूर्ण शुल्क परत केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या जगाची अवस्था डळमळीत झाली असून कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील अनेक नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांवरही परिणाम झाला आहे. कोरोनाचा फटका हज यात्रेलाही बसला आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी गर्दी टाळून हज यात्रा पार पडणार आहे.

सौदी अरेबियाच्या घोषणेनंतर केंद्रातील मोदी सरकारने महत्त्वाची घोषणा केल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. केंद्र सरकारने यंदाच्या हज यात्रेसाठी भारतीय यात्रेकरून न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातून २ लाख ३० हजार यात्रेकरूंनी हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केले होते. अर्जवेळी भरण्यात आलेले शुल्क कोणतीही कपात न करता केंद्र सरकार परत देणार असल्याचे नक्वी यांनी सांगितले.

यात्रेसंदर्भात सोमवारी सौदी अरेबियाने महत्त्वाची घोषणा केली होती. यात्रा रद्द न करता केवळ स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा होणार आहे. परदेशी असलेले मात्र, सध्या सौदी अरेबियात असलेल्या यात्रेकरूंना अटी शर्थींसह प्रवेश दिला जाणार आहे. ही यात्रेला जुलै महिन्याच्या अखेरीस सुरूवात होणार आहे.

Leave a Comment