यंदा 22 फुटांऐवजी 3 फुटांची असणार मुंबईच्या राजाची मुर्ती - Majha Paper

यंदा 22 फुटांऐवजी 3 फुटांची असणार मुंबईच्या राजाची मुर्ती


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले होते. यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. शासन याबद्दल जो निर्णय घेईल, त्याला पूर्णपणे पाठिंबा असल्याची ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

दरम्यान मुंबईतील गणेश गल्लीच्या गणपतीची मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या विविध रुपातील आणि भव्य गणेश मूर्ती हे दरवर्षी मुंबईच्या राजाची खासियत असते. पण हे चित्र यंदा गणेशभक्तांना मंडपात दिसणार नाही. कारण लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मुंबईच्या राजाची 22 फुटांची मूर्ती रद्द करुन 3 फुटांची मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गणपती मंडळामध्ये दोन दिवसांपूर्वीच चर्चा झाली होती. मंडळाने हा निर्णय कोरोनाच्या संकटामुळे घेतला असून लहान मूर्ती आणून उत्सवाची उंची वाढवणार असल्याची प्रतिक्रिया मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी दिली. त्याचबरोबर स्थानिकांना सोशल डिस्टन्स पाळून गणपती बाप्पाचे दर्शन देणार असून इतरांसाठी मंडळ ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करणार असल्याची माहितीही स्वप्निल परब यांनी दिली.

गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईच्या राजाची अनेक वर्षांपासून 22 फुटांची मनमोहक मूर्ती असते. येथे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या रुपातील बाप्पा दिसतो. केवळ भव्य मूर्तीच नाही तर मंडपातील देखावा पाहण्यासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. पण गणेशभक्तांना यंदा मोठी मूर्ती पाहायला मिळणार नसली तरी उत्सवाचा उत्साह मात्र कायम असेल.

दरम्यान गिरणगावातील 101व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने (चिंचपोकळीचा चिंतामणी) यंदा लोकभावनेचा विचार करुन त्याचबरोबर सध्याची कोरोना परिस्थिती पाहता आणि पोलिसांवर असलेली जबाबदारी त्यांच्यावर गणेशोत्सवात अतिरिक्त ताण पडू नये म्हणून आगमन सोहळा रद्द करुन चिंतामणीच्या मंडपातच मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला आहे. शासन मूर्तीच्या उंचीबाबत जे निर्देश देईल त्यानुसार, मूर्ती बनवण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष उमेश सिताराम नाईक यांनी दिली आहे. तसेच, मूर्ती जागेवर घडवण्यासाठी चिंतामणीच्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी तयारी दर्शवली आहे.

Leave a Comment