मुंबई महापालिका आयुक्तांचा दावा; जुलैपर्यंत मुंबईतील कोरोना पूर्णपणे येणार नियंत्रणात


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीची माहिती देताना शहरातील कोरोनाबाधितांच्या दुपटीचा सरासरी कालावधी ३६ दिवसांवर पोहचला असून महापालिकेने दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असलेल्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केल्यामुळे कोरोनावर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा दावा केला आहे.

मुंबई महानगरपालिकेने टेस्टिंग, ट्रॅकिंग, क्वारंटाइन आणि ट्रीटमेंट या सूत्रांचा अवलंब केला असून २४ तासांच्या आत कोरोना रुग्णांचा अहवाल वैद्यकीय प्रयोगशाळांना देणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर कोरोना उपचार केंद्र व रुग्णालये यांची क्षमता वाढविण्यात आली. मे महिन्यातील ३,७०० खाटांच्या तुलनेत आज रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेरपर्यंत १५ हजार तर जुलै अखेरपर्यंत २० हजार खाटा उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर महापालिका आयुक्तांनी मिशन झिरो या मोहिमेबद्दल स्पष्ट करताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. खाटा वाढविताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात पालिकेने पाचपट वाढ केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मुंबईत महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागांतून डॉक्टरांना आणण्यात आले असून मे महिन्यातील १००च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७००पर्यंत पोहोचली आहे. वरळी, धारावीप्रमाणे देवनार, गोवंडी, बैंगनवाडी या सर्व आव्हानात्मक भागांमध्ये फिरते दवाखाने व वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक बाधित शोधले आणि संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण केले. यातून कोरोनाची साखळी तोडण्यात मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील सुमारे ९४ लाख लोकांचे आतापर्यंत सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये पाच लाख ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर संसर्ग जास्त प्रमाणात होण्याची भीती होती. सुदैवाने ३ ते २२ जून २०२० म्हणजे मागील १९ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या एका महिन्यात डायलिसिस आवश्यक असलेल्या कोरोनाबाधित एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा पालिकेचा दावा आहे.

वॉर्ड वॉररूम महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये तयार केल्याने आता स्वत: पॉझिटिव्ह रुग्णांपर्यंत पालिका पोहोचते, त्यांच्याशी संपर्क आणि सुसंवाद साधून सर्व समस्यांचे निराकरण करीत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे आज रुग्णालयांमधील सुमारे अडीच हजार कोविड बेड रिकामे आहेत. तर १,३०० आयसीयू खाटांपैकी ७१ रिकाम्या आहेत. याच पद्धतीने कामगिरी होत राहिली तर जुलै मध्यापर्यंत मुंबईतील कोरोना संसर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात असेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

Leave a Comment