आता गुगलचे नवे फिचर सांगणार फोटो खरा आहे की खोटा


नवी दिल्ली – आजवर आपल्या अनेक फोटो आले असतील पण त्याची सत्यता आपल्यापैकी कोणीच परखली नसेल, हा फोटो खरा आहे कि फोटोशॉप केलेला आहे. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील बरेचसे फोटो हे फोटोशॉप केलेले असतात, पण या फोटोमुळे कधी कधी आपण गोत्यात देखील येऊ शकतो. त्यामुळेच आता नेटकऱ्यांपर्यंत पोहचलेला फोटो हा खरा आहे की खोटा हे याची माहिती आता खुद्द गुगलच देणार आहे. त्यासाठी गुगलने आपल्या सर्च इंजिनमध्ये बदल केला असून आता गुगल सर्च केल्यानंतर इमेज थम्बनेलच्या खालीच फॅक्टचेकचे लेबल दिसणार आहे.

जेव्हा गुगल सर्चच्या रिझल्टवर युझर्स टॅप करुन मोठ्या आकारामध्ये इमेज पाहतील तेव्हा त्यांना इमेजच्या फॅक्ट चेकसंदर्भातील माहिती वेब पेजवर दिसेल, अशी माहिती गुगल ग्रुप प्रोडक्टचे व्यवस्थापक हॅरीस कोहेन यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

गुगलने फोटोंच्या माध्यमातून पसरवण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी आपल्या सर्च आणि न्यूज पर्यायांमध्ये हे नवे फिचर आणले आहे. स्वतंत्र, अधिकृत माहिती स्त्रोतांकडून आलेल्या आणि गुगलच्या नियमांमध्ये बसणाऱ्या वेब पेजेसवरील फोटोंवर हे लेबल दिसणार आहे. फोटोंची सत्यता पडताळून पाहण्यासाठी ऑनलाइन प्रकाशक वापरतात त्या ‘क्लेमरिव्ह्यू’चा वापर करण्यात येणार आहे. युझर्सला ही माहिती सहज सापडावी म्हणून गुगलने आधीपासूनच फॅक्ट चेकची माहिती सर्चवर तसेच गुगल न्यूजमध्ये देण्यास सुरुवात केल्याचे आयएएनएस या वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

क्लेम रिव्ह्यूच्या माध्यमातून युट्यूबवरही ब्राझील, अमेरिका आणि भारतामध्ये माहितीची पडताळणी केली जाते. गुगलच्या रँकिंगमध्ये या फॅक्ट चेक लेबलमुळे फरक पडणार नाही. गुगलची सिस्टीम सर्वात योग्य, विश्वासार्हता असणारी माहिती दाखवण्याचे काम करते. फॅक्ट चेकसंदर्भातील माहितीही या सिस्टीमच्या माध्यमातून पुरवली जाते, असे कोहेन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. फॅक्ट चेकर्सने सध्याच्या कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये केलेल्या महत्वाच्या कामाची दखल घेत या वर्षाच्या सुरुवातीलाच गुगल न्यूज इनिशिएटीव्हने अशाप्रकारची खरी माहिती युझर्सपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणाऱ्या उपक्रमांना ६.५ मिलियन डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment