मानखुर्दमधील भीषण आगीत अनेक गोदामे जळून खाक


मुंबई : मुंबईच्या मानखुर्दमधील मंडाला विभागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप झोपडपट्टीला पुन्हा एकदा भीषण आग लागली असून तेथे असलेली अनेक गोदामे या आगीत खाक झाली आहे. ही आग मंडाला परिसरातील केमिकल, भंगारच्या गोदामांना आग लागली आहे. दरम्यान अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनविण्याचे साहित्य, रद्दीअशी अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पासून जवळच असलेल्या या झोपडपट्टीमध्ये असल्यामुळे येथे आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. अशाच एक गोदामाला आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान आग लागली आणि ही आग आजू बाजूच्या गोदामात पसरली. घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ही आग ज्या ठिकाणी लागली तिथून काहीच अंतरावर नागरी वस्ती आहे. लोक तिथे दाटीवाटीने राहतात. सकाळी मोठ्या प्रमाणात धूर झाल्यानंतर त्यांना आगीची माहिती मिळाली आणि ते लोक घराबाहेर पडले. सध्या कोरोनाची भीती आणि त्यात ही आग लागल्याने तेथील लोक पुरते हादरुन गेले आहेत. केमिकल आणि भंगारची ही गोदामे आहेत. ही गोदामे लोकवस्तीला लागूनच असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. याबाबत पालिकेकडे तक्रार करुन देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.

Leave a Comment