भारत-चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये चांगल्या, सकारात्मक वातावरणात चर्चा


नवी दिल्ली – पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत आता मिळत आहेत. चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे काल दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या चर्चेमध्ये दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर एकमत झाले. या बैठकीत गलवाण खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्यावर चर्चा झाली. ही चर्चा चांगल्या, सकारात्मक वातावरणात झाल्याचे वृत्त एनडीटीव्हीने लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या बैठकीत पूर्व लडाखमधील संघर्षाची स्थिती असलेल्या सर्व भागांमधून तणाव कमी करण्यासंबंधी चर्चा झाली. या बैठकीत लेफ्टनंट जनरल पदाचे अधिकारी सहभागी झाले होते. लेफ्टनंट जनरल पदावरील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मागच्यावेळी सहा जून रोजी चर्चा झाली होती. त्यावेळी सुद्धा तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. दोन्ही बाजूचे सैन्य हळू-हळू जात होते. पण चीनने १५ जून रोजी धोका दिला व पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चौकी उभारण्याचा प्रत्यत्न केला. त्या रात्री झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले.

दरम्यान दोन दिवसाच्या लडाख दौऱ्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे रवाना झाले आहेत. ते लडाखमध्ये मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस असतील. ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन या दौऱ्याच्यावेळी तेथील कमांडर्सकडून परिस्थिती जाणून घेतील. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ मागील सहा आठवडयांपासून तणावाची स्थिती आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड लोकेशन्सवर जाऊन तिथे तैनात असलेल्या सैनिकांबरोबर लष्करप्रमुख संवाद साधतील व त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतील लष्करातील सूत्रांनी पीटीआयला ही माहिती दिली.

Leave a Comment