सलाम : या व्यक्तीने विकली एसयूव्ही, आता कोरोनाग्रस्तांना पुरवतो आहे ऑक्सिजन सिलेंडर्स

देशभरातील कोरोनाग्रस्तांमध्ये 31 टक्के संख्या ही महाराष्ट्राची आहे. मुंबईत रुग्णांची संख्या एवढी वाढली आहे की बेड कमी पडू लागले आहेत. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. अशात अनेक नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत. मलाडमधील एका व्यक्तीने या संकटात लोकांची मदत करण्यासाठी चक्क आपली एसयूव्हीच विकली आहे. कार विकून ही व्यक्ती शेकडो गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवत आहे.

मुंबई मिररनुसार, 31 वर्षीय शाहनवाज शेख यांनी 2011 मध्ये फोर्ड एंडेव्हर खरेदी केली होती. 007 नंबर प्लेट असणारी या कारला त्यांनी मेकशिफ्ट रुग्णवाहिकेत बदलले होते. मात्र 28 मे ला बिझनेस पार्टनरच्या बहिणीच्या मृत्यूने सर्व काही बदलले. त्यांच्या पार्टनरची बहिण 6 महिन्यांची गर्भवती होती, जिचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. बेड रिकामे नसल्याने हॉस्पिटलमध्ये त्यांना घेतले नव्हते.

यावेळी शाहनवाज यांनी जाणीव झाली की जर वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर मिळाले असते, तर कदाचित बहिणीचे प्राण वाचले असते. येथूनच त्यांच्या डोक्यात ऑक्सिजन सिलेंडर विकत घेण्याचा विचार आला. यासाठी त्यांनी स्वतःची कार विकली व आलेल्या पैशातून ते शेकडो गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवत आहेत.

त्यांनी सांगितले की, मला कोरोनाग्रस्तांसाठी काहीतरी करायचे होते. त्यामुळे कार विकणे ही मोठी गोष्ट नाही. मी एका संपन्न कुटुंबातून येतो. पुढे जाऊन अशा 4 गाड्या खरेदी करू शकतो. मात्र या महामारीच्या काळात गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर पोहचवणे गरजेचे आहे. शाहनवाज आपल्या कारचा रुग्णवाहिका म्हणून वापर करत रुग्णांना देखील हॉस्पिटलमध्ये सोडत असे.

Leave a Comment