शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी शिवसेना भवन सील


मुंबई – कोरोनाची शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकाला लागण झाल्याचे समोर आल्यामुळे काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी शिवसैनिक मदतकार्य करत असतात व त्यावेळी ते अनेकांच्या संपर्कात येत असल्यामुळेच एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाली असावी. त्यामुळे शिवसेना भवन निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिली आहे.

संबंधित शिवसैनिकाला तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार सोमवारपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस बंद ठेवण्यात येत असल्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये, अशी सूचना देण्यात आली आहे. नुकताच पक्षाचा वर्धापन दिन शिवसेना भवनात साजरा झाला होता. यावेळी शिवसेना भवनात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित होते.

Leave a Comment