प्राणीमित्रांचा विरोध झुगारुन चीनने केले डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन - Majha Paper

प्राणीमित्रांचा विरोध झुगारुन चीनने केले डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन


बीजिंग – संपूर्ण जगाला कोरोना सारख्या जीवघेण्या व्हायरसची भेट देणाऱ्या चीनमध्ये आता (कु)प्रसिद्ध अशा डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. चीनमध्ये प्राण्यांचे मांस खाण्याच्या परंपरेमुळे वटवाघुळाच्या मांसामधून मानवामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचा आरोप जगभरातील अनेक देशांकडून केला जात असतानाच याकडे दुर्लक्ष करत चीनने मात्र आपली हेकेखोरी सुरुच ठेवल्याचे चित्र दिसत आहे.

जगावर कोरोनाचे सावट ओढावलेले असतानाही तेथील यूलीन डॉग मीट फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. कुत्र्यांना या फेस्टिव्हलमध्ये अमानुष मारहाण करुन मारले जाते आणि त्यांचे मांस शिजवून खाल्ले जाते. प्राणी मित्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाऊ नये यासाठी आंदोलनही केले होते. पण त्याचा काडीमात्र परिणाम झालेला नाही.

चीनमधील सरकारकडूनही कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अशा फेस्टिव्हलचे आयोजन करु नये यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर चीनमध्ये आरोग्य आणि प्राण्यांसंदर्भातील नियम कठोर करुन यावर आळा घालण्यासंदर्भातील नियम बनवण्यापर्यंतची चर्चा सुरु असतानाच याकडे लोकांनी मात्र दूर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे.

यासंदर्भात रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी चीनच्या नैऋत्यला असणाऱ्या यूलीन शहरामध्ये केले जाते. लाखो लोक या शहराला दहा दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलच्या कालावधीमध्ये भेट देतात. अनेकजण येथील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणारे लहान मोठ्या आकाराचे कुत्रे विकत घेऊन त्यांचे मांस खातात. या फेस्टिव्हलमध्ये कोरोनामुळे या वर्षी सहभागी होणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असेल अशी आशा प्राणी मित्रांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान केवळ प्राण्यांसाठी नाही तर स्वत:च्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी युलीनमधील लोक बदलतील अशी मला अपेक्षा आहे. या फेस्टिव्हलला गर्दी करुन हजेरी लावणे आणि कुत्र्यांची सार्वजनिक ठिकाणी कत्तल करुन त्यांचे मांस सेवन करणे हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे मत ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल या प्राणी मित्र संघटनेचे चीनसंदर्भातील धोरणांविषय तज्ज्ञ पीटर ली यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केले.

ह्युमन सोसायटी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये एक कोटी कुत्र्यांची दरवर्षी कत्तल केली जाते. अनेकदा युलीन डॉग मीट फेस्टिव्हलसाठी घरांमधील पाळीव किंवा रस्त्यांवरील भटके कुत्रे नेले जातात. चीन सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांस म्हणून वापरण्यात येणारे कुत्रे आणि पाळीव कुत्रे असे दोन प्रकार करण्याबद्दल विचार करत असून चीनमध्ये लवकरच जंगली प्राण्यांच्या मांसाच्या तस्करीवर निर्बंध घालण्याबद्दल नवीन कायदे करण्याचाही विचार सुरु असल्याचे वृत्त आहे.

Leave a Comment