या “शैक्षणिक जगबुडी” पासून संजय राऊत तुम्हीच वाचवा!, आशिष शेलार यांचे ट्विट


मुंबई – पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरुन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला असून या संदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. शेलार यांनी आपल्या ट्विटमधून सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे “ग्रहण” काही सुटत नसल्याचे म्हणत, सामंत यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अहंकाराचे “कंकण” काही तुटत नसल्याचेही म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही उल्लेख करत त्यांना राज्यातील सरकारचे संकटमोचन असे संबोधले आहे.

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी “सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे “ग्रहण” काही सुटत नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अहंकाराचे “कंकण” काही तुटत नाही. त्यामुळे एटीकेटीसह तमाम विद्यार्थी मित्र हो! चला आता “सरकारचे संकटमोचन” संजय राऊत यांचा धावा करु या! या “शैक्षणिक जगबुडी” पासून तुम्हीच वाचवा!”, असे म्हटले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली होती. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा अभाविपकडून विरोध होत आहे. अशातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे म्हणत त्यांना एक निवेदनही दिले होते.

दरम्यान, एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. यावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत, एटीकेटी आणि बॅकलॉगबाबत विद्यार्थ्यांच्या मनात शंका असल्या तरी त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल आणि तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच असेल, असे सांगितले होते.

Leave a Comment