नितेश राणेंचा शिवसेनाला इशारा, माझ्याकडील ‘ती’ पत्रे प्रहारमध्ये छापणार

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. या संपादकीयमधून अप्रत्यक्षरित्या नारायण राणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. आता यावरून आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना माझ्याकडील काही पत्र छापणार असल्याचे म्हणत इशारा दिला आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत राऊत यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणेंनी ट्विट केले की, “सामनाच आमच्यावर प्रेम आहे…असणारच..का नाही असणार शेवटी ओल्ड इज गोल्ड. पण..काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायच पण नाही. काही “पत्रं” आहेत माझ्याकडे. तळकोकणच्या प्रहार मधुन लवकरच छापतो. मग बघु कशी कुरकुर होते.”

यानंतर आणखी एका ट्विटमध्ये राणे म्हणाले की, “‘सामना’च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले की फडणवीसांबद्दल उलट बोलायचं. राणेंना भेटले की ठाकरेंबद्दल उलट बोलायचं. ठाकरेंना राणेंबद्दल उलट बोलायचं. राज्यपाल भेटले की पवारांबद्दल उलट बोलायचं. असं करून स्वतःची किंमत संपवली! ना भावाला मंत्री,ना स्वतः संपादक!”, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

दरम्यान, ”महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थीर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर अँण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे. मात्र, त्यांची टुरटूर सुरु आहे. वैफल्य, दुसरे काय! भाजपाच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा उल्लेख थेट करत, तर राणे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

Leave a Comment