… म्हणून या व्यक्तीने थेट कारमध्येच थाटले किराणा दुकान

दिल्ली-देहरादून हायवेवरील सर्व्हिस रोडच्या निर्मितीच्या वेळी दुकान तोडल्यानंतर एका व्यक्तीने थेट आपल्या कारमध्येच दुकान थाटले आहे. कारवर भाजपचा झेंडा देखील लावला आहे. मेरठच्या शिवाया गावातील हे किराणा दुकान येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. लोक रस्त्यावर थांबून येथे सामान खरेदी केल्याशिवाय पुढे जात नाहीत. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

जाहिद रफी हे हायवेच्या कडेला हे अनोखे दुकान लावतात. सर्व्हिस रोडच्या निर्मितीसाठी जमीन अधिग्रहण करण्यात आली, त्यात त्यांच्या दुकानाची जागा देखील आली. प्रशासनाने त्यांचे दुकान पाडले व रस्त्याचे काम सुरू केले. यानंतर बेरोजगार झालेल्या जाहिद रफी यांनी थेट कारमध्येच दुकान थाटण्याचे ठरवले.

त्यांनी कारलाच चक्क दुकानाचे स्वरूप दिले. रफी यांनी या कार दुकानाला आधीच्या जागेवरच उभे केले आहे. हायवेच्या कडेला असल्याने या दुकानाची विशेष चर्चा आहे. हायवेवरून जाणारे अनेकजण येथे थांबतात व सामान खरेदी करतात.

Leave a Comment