दोन कंपन्यांना देशात ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन घेण्यास, विकण्यास परवानगी


नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार जे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरत आहे, त्या औषधाचे उत्पादन आता भारतात होणार आहे. त्याचबरोबर देशात आता त्याची विक्रीही करता येणार आहे. रेमडेसिवीर असे त्या औषधाचे नाव आहे. रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना भारताच्या औषधी महानियंत्रक विभागाने परवानगी दिल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

महाराष्ट्र सरकारलाही रेमडेसिवीर हे औषध हवे होते. त्यासाठी त्याची बांगलादेशातून आयात करण्यात येणार होती. पण, ही आयात काही कारणास्तव थांबवण्यात आली आहे. आता त्याचे उत्पादन भारतातच होणार असल्याने कोरोना रुग्णांसाठी ही दिलासा बाब देणारी आहे.

पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, हॉस्पिटलमध्ये जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत हे रेमडेसिवीर औषध केवळ त्यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना त्याचे उत्पादन आणि विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय औषधी महानियंत्रक विभागाने शनिवारी घेतला.

दरम्यान भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीला फेविपिरावीर या औषधाच्या उत्पादन आणि वितरणासाठी परवानगी दिली होती. कोरोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध ठरले होते. आता त्यानंतर रेमडेसिवीर या औषधाच्या उत्पादनासाठीही परवानगी मिळाली आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment