जगन्नाथ रथ यात्रा आयोजन प्रकरणी चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


नवी दिल्ली – जगन्नाथ रथयात्रेच्या आयोजनासाठी 18 जूनच्या आधीच्या आदेशात दुरुस्ती करण्याच्या चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोरोना साथीच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पुरीसह ओडिशाच्या विविध भागात जगन्नाथ रथ यात्रेवर बंदी घातली आहे.

ओडिशामध्ये पारंपारिक अशा प्रसिद्ध रथयात्रेबाबत बर्‍याच दिवसांपासून साशंकता होती, मंदिर समितीने भाविकांशिवाय रथ यात्रेचे आयोजन करावे अशी सूचना केली होती, पण न्यायालयाने अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देणार नसल्याचे सुनावणीत स्पष्ट केले होते. आता या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या चार याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तत्पूर्वी ओडिशामधील प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा तसेच त्याच्याशी संबंधित इतर सर्व गोष्टींसाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी यावेळी आम्ही रथयात्रेला जर परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाही, असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात रथयात्रेला परवानगी मिळाली तर मोठी समस्या निर्माण होईल याकडे लक्ष वेधणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या रथयात्रेला २३ जून पासून सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला.

Leave a Comment