जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 90 लाखांच्या उंबरठ्यावर


नवी दिल्ली : जगभरातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप कायम असून जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दररोज वाढ होत आहे. कोरोनामुळे मागील 24 तासात 5 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर दोन लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

यासंदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार 89 लाख 21 हजार 385 हजार लोकांना जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 66 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे जगभरातील 47.43 लाख लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगातील 8 देशांमध्येच 62 टक्के कोरोनाबाधित आहेत.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारी बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोरोनाचे 4,11,727 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 13,277 बळी गेले आहेत. सध्या भारतात 170,269 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 228,181 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेतील 23,30,578 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे 1,21,980 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

ब्राझीलमध्ये 10,70,139 कोरोनाबाधित आहेत तर 50,058 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कोरोनामुळे यूकेत 42,589 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 3,03,110 एवढी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,610 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,38,275 हजार एवढा झाला आहे.

Leave a Comment