सलमान, करणसह पाचजणांविरोधात सुशांत आत्महत्येप्रकरणी खटला चालणार


बॉलिवूडमधील नेपोटीझ्म, घराणेशाही सारखे अनेक प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ऐरणीवर आले आहेत. त्यातच सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान, करण जोहर, आलिया, सैफ अली खान यांना जबाबदार धरत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. पण आता सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लिला भन्साली, साजिद नाडियावाला या पाचजणांवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.

यासंदर्भात उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सलमान, करणसह पाचजणांवर सुशांत सिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यामुळे या पाचही जणांना आता न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे.

यासंदर्भात वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी याचिका दाखल केली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतने वारंवार व्हिडीओच्या माध्यमातून सुरुवातीपासून याप्रश्नी आवाज उठवला आहे. त्यातच गायक सोनू निगम यांनी देखील हे न रोखल्यास आणखी कोणी आत्महत्या करेल, अशी भीती वर्तवली आहे. प्रस्थापित अभिनेते, दिग्दर्शक, प्रोडक्शन कंपन्यांविरोधात सोशल मीडियात आवाज उठवला जात आहे. याच दरम्यान सुशांतच्या आत्महत्येनंतर सलमानचे पोस्टर्स जाळण्यात आले. बिहारमध्ये सलमानच्या बिईंग ह्यूमन या आऊटलेटवर सुशांतच्या चाहत्यांनी हल्ला चढवला. जागोजागी लागलेले सलमानचे पोस्टर्सदेखील फाडून टाकण्यात आले.

Leave a Comment