पोलिसांचा महापालिका अधिकाऱ्यांसमोर मुंबईतील ‘या’ भागांमध्ये पुन्हा लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव


मुंबई – मुंबई पोलिसांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या नियमांची सातत्याने होत असलेली पायमल्ली लक्षात घेता मुंबईतील काही भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेसमोर ठेवला आहे. पण हे शक्य नसल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुंबईच्या उत्तर उपनगरांमध्ये गेल्या आठवड्यात पोलिसांत दाखल झालेल्या प्रत्येक चार गुन्ह्यांमागे तीन गुन्हे हे लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणातील होते.

शुक्रवारी मुंबई पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. मुंबई पोलिसांनी या बैठकीत गोरेगाव ते दहिसरदरम्यान चार भागांमध्ये लॉकडाउन पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला. पण सध्या लॉकडाउन लागू करणे व्यवहार्य नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा डबलिंग रेट दहिसरमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले आहे. आर-नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या या ठिकाणी १६ दिवसांचा डबलिंग रेट असून शुक्रवारी १३१८ कोरोना रग्णांची नोंद झाली. तर शेजारील आर-सेंट्रल वॉर्ड ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेचा भागही येतो तिथेही डबलिंग रेटचे प्रमाण मोठे आहे. शुक्रवारी १८८२ रुग्णांची नोंद १८ दिवसांचा डबलिंग रेट असणाऱ्या या वॉर्डमध्ये झाली. शनिवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईचा डबलिंग रेट ३४ दिवस आहे.

शहरातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात जास्त कोरोनाबाधित पी-नॉर्थ वॉर्डमध्ये आढळले आहेत. या ठिकाणी जवळपास १० लाख लोकसंख्या असून मालवणी, म्हाडा कंपाऊंट, मार्वे रोड, कुरार व्हिलेज येथे लोक वस्तीस आहेत. मालाड पूर्व येथे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आला होता. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. पी-नॉर्थ वॉर्डचाही यामध्ये समावेश आहे.

मालाड पूर्व येथील आप्पापाडा आणि कोकणीपाडा येथे गेल्या १० दिवसांपासून पूर्ण लॉकडाउन असून चांगले परिणाम समोर आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्याही कमी झाल्यामुळे आम्ही या दोन ठिकाणी तसेच कांदिवली पूर्व येथील काजूपाडा आणि दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगर येथे लॉकडाउन वाढवण्याचे महापालकेला सुचवले. यावेळी महापालिका अधिकारी आणि सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) हजर होते. महापालिका अधिकाऱ्यांना आमचे म्हणणे योग्य वाटल्याचे दिसत होते. आता आम्ही आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आर-सेंट्रल वॉर्डच्या सहाय्यक मनपा आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी शनिवारी सांगितले की, या चार ठिकाणी लॉकडाउन लागू करण्याचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी ठेवला असला, तरी तो व्यवहार्य नाही. माझ्या वॉर्डमध्ये ७० टक्के केसेस या मोठ्या इमारतींमधील असून ३० टक्के रुग्ण झोपडपट्ट्यांमधील आहेत. या आधीच कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर आहेत. मोठ्या इमारतींमधील रुग्णसंख्या जास्त असल्याने आम्ही त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणत आहोत.

Leave a Comment