अनेक वर्षांनंतर बकनर यांनी कबूल केले सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने आऊट दिले


नवी दिल्ली – आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध पंच स्टिव्ह बकनर हे सतत वादग्रस्त निर्णयांसाठी परिचीत होते. क्रिकेट प्रेमींच्या मनात अद्यापही सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचा राग कायम आहे. आपल्या अचूक निर्णयासाठी ओळखले जाणारे आयसीसीचे सर्वोत्तम पंच बकनर यांची त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यातील कामगिरी फारशी चांगली नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर, आता बकनर यांनी मासॉन अॅण्ड गेस्ट्स या रेडिओ कार्यक्रमात बोलताना सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे कबूल केले आहे.


होय, मी सचिनला दोनवेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे मला आठवते. चुकीचे निर्णय देणे ही कोणत्याही पंचासाठी चांगली बाब नाही, त्याला ही गोष्ट आयुष्यभर सहन करावी लागते, पण चुका या माणसाकडूनच होतात. ऑस्ट्रेलियात असताना सचिनला मी एकदा पायचीत बाद दिले होते. पण त्यावेळी तो बॉल वरुन जात होता. तसेच दुसऱ्या वेळी भारतात खेळत असताना मी सचिनला झेलबाद दिले होते. पण त्यावेळेसही त्याच्या बॅटला चेंडू लागलेला नव्हता. भारतीय संघ इडन गार्डन्सवर खेळत असेल तर लाखभर प्रेक्षकांच्या आवाजात तुम्हाला काहीही ऐकू येत नाही. मलाही या चुकांबद्दल खेद आहे. मी देखील माणूस आहे, चुका करणे हा प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे आणि त्याने केलेल्या चुका मान्यही करता यायला हव्यात. सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याबद्दल बकनर बोलत होते. दरम्यान स्टिव्ह बकनर निवृत्तीनंतर न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले असून आयसीसीनेही २०१९ साली सचिन आणि स्टिव्ह बकनर यांच्यातील कथित द्वंद्वावर एक गमतीशीर ट्विट केले होते.

Leave a Comment