आपल्या 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार BMW ! - Majha Paper

आपल्या 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ देणार BMW !


नवी दिल्ली – जर्मनीतील लक्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) कोरोना महामारीच्या संकटकाळात आपली उत्पादन क्षमता कमी करू इच्छित आहे. अशा परिस्थितीत, कंपनी करारावर काम करणाऱ्या आपल्या 10,000 कर्मचार्‍यांच्या करारामध्ये वाढ करणार नाही. ईटीच्या अहवालानुसार कंपनीच्या एका सूत्राने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला याची माहिती दिली.

म्यूनिखस्थित कंपनीने म्हटले आहे की त्यांनी कार्य परिषद (कर्मचारी प्रतिनिधी) यांच्याशी करार केला आहे आणि टिकाऊ भविष्यासाठी कर्मचारी उपाय यांचे पॅकेज तयार केले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली. ज्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विशेषत: वाहन क्षेत्रावरही लक्षणीय परिणाम झाला आहे. वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ज्यामुळे कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. स्थानिक सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून कंपन्यांनी कमी क्षमतेने काम सुरू केल्यानंतर, कर्मचार्‍यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी टाळेबंदीसारख्या छत्राचा अवलंबही केला आहे. जर्मनीची बहुराष्ट्रीय वाहन कंपनी बीएमडब्ल्यूनेही या पर्यायाला प्राधान्य दिले.

बीएमडब्ल्यूने सांगितले की जे लोक सेवानिवृत्तीच्या जवळ आहेत त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल व त्यांना अकाली सेवानिवृत्ती दिली जाईल. याशिवाय पुढील उच्च शिक्षणासाठी तरूणांना आर्थिक मदत दिली जाईल. त्याचबरोबर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगाराची हमीही दिली जाईल. बीएमडब्ल्यूचे जगभरात 1,26,000 कर्मचारी आहेत.

बीएमडब्ल्यू व्यतिरिक्त, अनेक वाहन उत्पादक आणि ऑटोमोबाईल घटक उत्पादक देखील कर्मचारी कपात करत आहेत. फ्रेंच कार निर्माता रेनोने (Renault) मे महिन्यात कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. रेनोच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून जगभरातील 15,000 कर्मचार्‍यांची कपात करण्यात येईल. फ्रान्समध्ये रेनोचे 48,500 कर्मचारी आहेत. कंपनी या कर्मचार्‍यांपैकी 4500 कर्मचार्‍यांची कपात करण्यात येईल.

Leave a Comment