खबरदार ! भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत चीन; उघडू नका अनोळखी ईमेल


नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर देशात चीन विरोधात संताप व्यक्त करताना असतानाच दुसरीकडे चीनकडून सुरु असलेल्या कुरापती काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. सीमेवरील झटापटीनंतर आता भारताविरुद्ध चीनने नवे हत्यार उपसले आहे. सायबर अ‍ॅटकचे हे हत्यार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार 21 जुनपासून चीन भारतावर सायबर अ‍ॅटक करण्याच्या तयारीत आहे. इमेलच्या माध्यमातून हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ncov2019.gov.in या ईमेलमधून हा अ‍ॅटक होण्याची शक्यता आहे. ‘Free Covid 19 Test’ असा या ईमेलचा विषय असू शकतो.

चीनी सायबर अ‍ॅटक वाचण्यासाठी या ईमेलसोबत आलेली अ‍ॅटचमेंट उघडू नका. चीनमधील हॅकर्सच्या रडारावर भारतातील 20 लाख लोकांचे ईमेल असल्याची माहिती मिळत आहे. खासगी आणि आर्थिक ईमेलवर हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. ऑस्ट्रेलियावर देखील अशाच प्रकारचा सायबर अ‍ॅटक काही दिवसांपूर्वी झाला होता. या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर दोन-चार वेबसाईटवर नजर ठेवली जात आहे. या सायबर हल्ल्याच्या तयारीला चीन हॅकर्स लागले आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दरम्यान सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांनी या वृत्तवाहिनीला सांगितले, की या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला कोणताही अनोळखी मेसेज आला, ज्यात एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल तर त्या लिंकवर क्लिक करु नका. तुम्हाला एखादा मेल आला, ज्यात एखादी अ‍ॅटचमेंट असेल तर ती डाऊनलोड करू नका. असे सायबर हल्ले कोरोना संकट काळात वाढल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे आपण सायबर सुरक्षेबद्दल जागरुक राहणे गरजेचे आहे. याला आपल्या जीवनशैलीचा भाग करुन घ्यायला हवे.

Leave a Comment