ग्लेनमार्क कंपनीचा दावा; कोरोना रुग्णांसाठी फॅविपिरावीर अँटीव्हायरल औषध प्रभावी


मुंबई : भारतात फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली ‘ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स’ या औषध कंपनीने अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. हे औषध कोरोना संसर्गाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला असून याबाबतची माहिती ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने शनिवारी निवेदनाद्वारे दिली.

औषध उत्पादन आणि वितरणाची परवानगी ‘भारतीय औषध महानियंत्रक’ (DCGI) संस्थेकडून मिळाल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले आहे. अशा प्रकारची कोरोना संसर्गावरील उपचारासाठी मंजुरी मिळालेले ‘फॅबीफ्लू’ हे गोळ्यांच्या रूपात सेवन करता येणारे पहिले ‘फॅविपिराविर’ औषध असल्याचा कंपनीचा दावा आहे.

त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. विशेष बाब म्हणजे 103 रुपये ऐवढी या औषधाच्या एका गोळीची साधारण किंमत आहे. या औषधाचे 1800 मिलिग्रॅमचे दोन डोस पहिल्या दिवशी घ्यावे लागणार आहेत. त्यांनतर 14 दिवसांपर्यंत 800 मिलिग्रॅमचे दोन डोस दररोज घ्यावे लागतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment