या चायनीज कंपन्यांनी ‘टीम इंडिया’मध्ये लावले आहेत कोट्यावधी रुपये


मुंबई : बीसीसीआयचा कमाईचा सगळ्यात मोठा मार्ग असलेली आयपीएल स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच आता बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीपुढे नवी अडचण निर्माण झाली आहे. देशात चीनविरोधातील मोहीम लडाखच्या गलवान खोऱ्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर आणखी आक्रमक झाली आहे. देशातील नागरिकांकडून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण सध्या चीनच्या कंपन्यांनीच बीसीसीआयमध्ये सर्वाधिक पैसा ओतला आहे.

आयपीएलचा जगातील सर्वोत्तम ५ क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश होतो. चीनची मोबाईल कंपनी विवोकडे याच आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क आहेत. बीसीसीआयला विवोने ५ वर्षांसाठी २,२०० कोटी रुपये दिले आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन फॅन्टसी लीग असलेल्या ड्रीम-११ आणि पेमेंट अॅप पेटीएमही आयपीएलच्या अधिकृत जाहिरातदारांपैकी आहेत.

जगातील सगळ्यात मोठी व्हिडिओ गेमिंग कंपनीपैकी एक चीनी कंपनी टेनसेंटची ड्रीम-११ मध्ये मोठी हिस्सेदारी आहे. तर चीनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाची पेटीएममध्ये ३७.१५ टक्के हिस्सेदारी आहे. आयपीएलचे असोसिएट स्पॉन्सर असलेल्या स्विगीमध्येही टेनसेंटची ५.२७ टक्क्यांची भागिदारी आहे.

५ वर्षांसाठी भारतीय टीमला स्पॉन्सर करण्यासाठी ऑनलाईन स्टडी अॅप बायजूसने बीसीसीआयला १,०७९ कोटी रुपये दिले आहेत. टेनसेंटची बायजूसमध्येही हिस्सेदारी आहे. याशिवाय बीसीसीआयला प्रत्येक मॅचमध्ये स्पॉन्सरींगचे पेटीएम ३.८ कोटी रुपये देते. बीसीसीआयचा ड्रीम-११देखील अधिकृत स्पॉन्सर आहे.

खजिनदार अरुण सिंग धुमळ यांना बीसीसीआयमध्ये चीनी कंपन्यांनी लावलेल्या पैशांबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी सरकारकडून आम्हाला चीनी कंपन्यांना रोखण्याचे कोणतेही निर्देश आले नसल्याचे सांगितले. बीसीसीआयवर भारतीय ऑलिम्पिक संघ (आयओए)च्या घोषणेमुळे दबाव आला आहे. भारतीय ऑलिम्पिक दलाचे स्पॉन्सर असलेली चीनी बॅडमिंटन निर्माता कंपनी ली निंगसोबतचा करार संपवण्यात येणार आहे. आमच्यासाठी सर्वात आधी देश आहे, स्पॉन्सर काय नंतर ही शोधू शकतो, असे आयओएचे सचिव राजीव मेहता यांनी सांगितले.

Leave a Comment