२६/११च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणाला लॉस अँजेलिसमधून अटक


नवी दिल्ली: २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर हुसेन राणा (५९) याला अमेरिकेतील लॉस अँजेलिस शहरात अटक करण्यात आली आहे. आता भारत तहव्वुरचा ताबा मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडण्याची तयारी करत आहे.

मूळचा पाकिस्तानचा असलेला तहव्वुर हुसेन राणा नंतर कॅनडाचे नागरिकत्व घेऊन तिथे स्थायिक झाला होता. स्वतःच्या व्यवसायाचे कारण पुढे करुन त्याने वेगवेगळ्या देशांचे दौरे केले. तहव्वुर हुसेन राणा डेव्हिड हेडली उर्फ दाऊद हेडलीचा खास मित्र होता. तहव्वुरच्या सूचनेनुसार हेडली टेहळणी करणे, महत्त्वाची माहिती मिळवणे यासाठी काम करत होता. या कामात अडचण येऊ नये म्हणून तो तहव्वुरच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी फिरत असल्याचा दावा करत होता.

तहव्वुर मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी स्वतः ताज हॉटेलमध्ये काही काळ थांबला होता. नंतर ताजमध्ये हेडलीने मुक्काम केला तसेच मुंबईच्या वेगवेगळ्या भागांची घातपाताच्या दृष्टीने टेहळणी करत बरीच माहिती मिळवली. या माहितीआधारे पुढे दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात आली. ही योजना लष्कर ए तोयबाच्या दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी अंमलात आणली. १६६ सामान्य नागरिक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले. सुरक्षा पथकांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले. मुंबई पोलिसांच्या एका टीमने जीव धोक्यात घालून कसाब नावाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जीवंत अटक केली. कसाबला अटक झाल्यामुळे पाकिस्तानचा भारतविरोधी कट जगासमोर उघड झाला. नंतर कसाबला पुण्याच्या येरवडा कारागृहात २१ नोव्हेंबर २०१२ रोजी फाशी देण्यात आली.

डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रावर झालेला दहशतवादी हल्ला आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेला केलेली मदत या दोन प्रकरणांमध्ये तहव्वुरला अमेरिकेने अटक केली. त्याला १० जून २०११ रोजी ज्युरींनी दोषी ठरवल्यामुळे १४ वर्षांची शिक्षा झाली. पण कोरोना झाल्याचे कारण देत त्याने उपचारासाठी या वर्षी १० जून रोजी जामीन मिळवला होता. भारताच्या विनंतीनंतर अमेरिकेने तहव्वुरला पुन्हा अटक केली आहे. त्याला लवकरच भारताच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.

१९९७च्या कराराआधारे भारताने तहव्वुरचा ताबा मागितला आहे. या संदर्भात २२ जून रोजी तहव्वुरचा वकील बाजू मांडणार आहे, नंतर २६ जून रोजी अमेरिकेचे सरकारी वकील युक्तिवाद करतील. या सुनावणीत भारताला ताबा देण्याचा निर्णय झाल्यास तहव्वुरला भारताच्या न्यायालयासमोर आरोपी म्हणून हजर केले जाईल. तहव्वुरला भारतात आणणे शक्य झाल्यास २६/११ प्रकरणात अद्याप उजेडात आली नसलेली काही नवी माहिती भारताच्या हाती येण्याची शक्यता आहे. तहव्वुर विरोधात भारतात कलम ३७० आणि १२० ब तसेच आणखी काही कलमांआधारे न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment