धक्कादायक…; ‘अत्यंत वेगाने’ होत आहे कोरोनाचा प्रसार : जागतिक आरोग्य संघटना


जिनिव्हा: जगभरातील बहुतांश देशांना कोरोना या जीवघेण्या व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले असून दिवसेंदिवस या रोगाचा प्रादुर्भाव वेगाने जगभरात होत असल्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी धक्कादायक माहिती जगाला दिली आहे.

WHOच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव ‘अत्यंत वेगाने’ होत असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना रुग्ण काल एका दिवसात आढळल्याचे सांगत त्यांनी ही भीती व्यक्त केली आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस गेब्रेयेसस यांनी नवीन कोरोना केसेसमधील अर्ध्या केसेस या उत्तर आणि दक्षिणी अमेरिका खंडातील आहेत तर दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियात देखील कोरोनाचा प्रभाव मोठा असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर टेड्रोस गेब्रेयेसस यांनी आपण आता नवीन आणि धोकादायक टप्प्यावर असून महामारीला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अनेक लोक घरात राहून निराश आहेत तर काही देश बंधने उठवण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

टेड्रोस यांनी पुढे सांगितले की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने होत असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे आणि हात धुण्यासारख्या गोष्टी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. ते म्हणाले की, मृतकांची संख्या खासकरुन निर्वासितांमध्ये जास्त असेल. यातील 80 टक्क्यांहून अधिक विकसनशील देशांमध्ये राहात आहेत.

Leave a Comment