सुशांत आत्महत्या; करण, आलिया आणि सोनमच्या चाहत्यांच्या संख्येत घट


14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे नैराश्याचे कारण सध्यातरी सांगितले जात आहे. पण बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येला सिनेसृष्टीतील घराणेशाही जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याचे सर्व खापर निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांच्या माथी फोडले जात आहे. सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या मंडळींनी काही सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या. पण त्यांच्या या पोस्टमुळे नेटकरी प्रचंड संतापले आहेत. परिणामी सोशल मीडियावरील त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे.

नेटकरी सलमान आणि करणला ‘नेपोटिझम प्रमोटर’ असे संबोधत आहेत. स्टार किड्सला संधी मिळावी म्हणून या मंडळींनी अनेकांची करिअर संपवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर करणचे एक लाख ८८ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. तर दुसरीकडे सलमानचे ५० हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टला सुद्धा घराणेशाही विरोधातील संतापाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तिचे तब्बल चार लाख ४४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. अभिनेत्री सोनम कपूरच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. तिचे ८४ हजार फॉलोअर्स कमी झाले आहेत. या सर्व मंडळींनी कधीनाकधी सुशांतची खिल्ली उडवली होती. त्याचे व्हिडीओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नेटकरी संतापले आणि त्यांनी या कलाकारांना अनफॉलो करण्यास सुरुवात केली.

एकीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीचा पुरस्कार करणाऱ्या कलाकारांचे फॉलोअर्स कमी होत आहेत. तर दुसरीकडे त्यांचा विरोध करणाऱ्या कंगनाच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होत आहे. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला तिने दोष दिला आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांमध्ये तिचे तब्बल १२ लाख फॉलोअर्स वाढले. यापूर्वी तिचे केवळ २० लाख फॉलोअर्स होते. आता ३२ लाख लोक तिला फॉलो करत आहेत.

Leave a Comment