पुणे महानगरपालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


पुणे : राज्यातील लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या 112 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहेत, तर सध्या 46 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 61 कर्मचारी कोरोनामुक्त झाल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान पुण्याचे आयुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या जुलै अखेर 18 हजारांवर जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शहरातील ज्या भागांमध्ये यापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता, तेथेही आता कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरीलही ताण वाढला आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांवर यापुढे घरीच उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांकडून घरातच राहण्याचे हमीपत्रही घेण्यात येणार आहे. अशा रूग्णांना टेलिमेडिसीनद्वारे उपचार देण्यात येतील. या निर्णयामुळे पालिका आरोग्य यंत्रणेवरील 25 टक्के ताण कमी होणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही 14 हजार 181 पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 560 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Comment