देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात काल दिवसभरात १३,५८६ नव्या रुग्णांची वाढ


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने होणारी वाढ देशवासियांच्या चिंतेत आणखीनच भर घालत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून काल दिवसभरात १३ हजार ५८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात पहिल्यांदाच एका दिवसात १३ हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ८० हजार ५३२ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये ३३६ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत एकूण १२ हजार ५७३ लोकांचा या व्हायरसमुळे बळी गेले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.९६ टक्के आहे. एकूण दोन लाख ४ हजार ७११ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, तर १ लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये १ लाख ६५ हजार ४१२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या व ७.७८ टक्के रुग्णांची कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत ६२ लाख ४९ हजार ६६८ नमुना चाचण्या झाल्या आहेत.

राजधानीत सध्या २४२ नियंत्रित विभाग असून तिथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असून ७७ टक्के लोकांची वैद्यकीयदृष्टय़ा पाहणी करण्यात आली असून २० जूनपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना नमुना चाचण्यांचे दर कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आता मुंबईप्रमाणे दिल्लीतही नमुना चाचणी २४०० रुपयांमध्ये करणे शक्य होणार आहे. जलद निष्कर्षांसाठी रॅपिड अण्टिजिन चाचणीही सुरू झाली आहे.

Leave a Comment