भारत-चीन संघर्षामुळे राम मंदिर उभारणीच्या कामाला तुर्तास स्थगिती


अयोध्या – भारत आणि चीनच्या जवानांमध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. राम मंदिर ट्रस्टनेही सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर ट्रस्टकडून राम मंदिर उभारणीचे काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर असून सध्या देशाचे संरक्षण करणे ही सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे राम मंदिर ट्रस्टने म्हटले आहे.

मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाकडून राम मंदिर प्रश्नी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, भारत चीन सीमेवरील तणावाबाबत राम मंदिर ट्रस्टने चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर लवकरच नव्या तारखेचीही घोषणा करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती दिली. देशातील परिस्थितीनुसार मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि अधिकृतपणे जाहीर केला जाईल, अशी माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.दरम्यान, यावेळी राम मंदिर ट्रस्टकडून जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

दरम्यान, चीनविरोधात अयोध्येतील विविध हिंदू संघटनांनी निदर्शने केली. चीनचा ध्वज जाळून हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. तर चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांचा पुतळा जाळत आणि चिनी बनावटीच्या वस्तू तोडून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Leave a Comment