लडाखमधील मोक्याच्या ठिकाणी सुखोई, मिराज आणि जॅग्वार तैनात


नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर चीन बरोबर निर्माण झालेला तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच चीनच्या कुठल्याही आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इंडियन एअर फोर्सही पूर्णपणे सज्ज आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंडियन एअर फोर्सने आपली लढाऊ विमाने मोक्याच्या ठिकाणी फॉरवर्ड बेसेस आणि एअरफिल्डवर तैनात केली आहेत.

दरम्यान लेह आणि श्रीनगर या दोन एअर बेसला भेट देऊन एअर फोर्स प्रमुख आर.के.एस भदौरिया यांनी तयारीचा आढावा घेतला. चीनने पूर्व लडाखमध्ये भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणारी कुठलीही कृती केल्यास लेह आणि श्रीनगर हे दोन एअरबेस तात्काळ प्रत्युत्तराची कारवाई करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.

चीनने गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री धोका देऊन केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाल्यानंतर सर्वोच्च स्तरावर सुरक्षेचा आढावा घेऊन लष्करी पर्यायांचा विचार करण्यात आला. त्यानंतर लगेच एअर फोर्स प्रमुखांनी केलेला हा दौरा खूप महत्वपूर्ण ठरतो. १५ जूनच्या रात्री चीनने एकतर्फी निर्णय घेत नियंत्रण रेषाच बदलण्याचा प्रयत्न केला होता.

आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये एअरफोर्स प्रमुखांनी तयारीचा आढावा घेतला. चीनने पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेच्या पलीकडे १० हजार सैनिक जमा करुन ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. आर.के.एस. १७ जूनला लेहमधील त्यानंतर दुसऱ्यादिवशी १८ तारेखला श्रीनगरला भेट देऊन भदौरिया यांनी तिथल्या तयारीचा आढावा घेतला.

पूर्व लडाखच्या जवळ हे दोन्ही एअरबेस आहेत. या बेसवरुन डोंगराळ भागात कुठलेही ऑपरेशन्स करता येऊ शकते. भारताला चीनवर वरचढ होण्याची संधी असल्याचे सूत्रांनी सांगितले. एअरफोर्सने सुखोई-३० एमकेआय, मिराज २००० आणि जॅग्वार मोक्याच्या ठिकाणी तैनात केले आहेत. जिथून अत्यंत कमी वेळात उड्डाण करुन कुठलही ऑपरेशन करता येईल. पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना तात्काळ आवश्य़क मदत मिळण्यासाठी अपाची हेलिकॉप्टर सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सैनिक तुकडया वेगाने पोहोचवण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर्सही सज्ज आहेत.

Leave a Comment