मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आता मी भावी पंतप्रधान म्हणून पाहत आहे – राऊत


मुंबई : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विराजमान झाल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे स्वप्न तर पूर्ण झाले, पण आता उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. त्यांनी आता फक्त राज्याचे नाही तर पूर्ण देशाचे नेतृत्व करण्याची वेळ आल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना देशावर आलेल्या कोरोना आणि चीन या संकटांचा उल्लेख केला. त्यासोबतच त्यांनी पंतप्रधानांबरोबर चीनविषयी होणाऱ्या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहितीही शिवसैनिकांना दिली. जो आपल्याबरोबर राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठी आज मी मुख्यमंत्री म्हणून बसलो असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

पण उद्धव यांच्याआधी बोलायला उभे राहिलेल्या खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील सत्तेसाठी सूर आळवला. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली असून देशाचे नेतृत्व करण्याची आता वेळ आल्याचे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, म्हणून कोरोनाच्या संकटावर महाराष्ट्र मात करू शकत आहे. आता पूर्ण सत्ता हाती यायचे स्वप्न आहे. सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच खरे स्वप्न पूर्ण होईल, असेही राऊत म्हणाले.

Leave a Comment