सलमानवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी FWICE ही संस्था सरसावली


मुंबईमधील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण त्यानंतर त्याने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केल्याची सध्या सर्वत्र होत आहे. दरम्यान अभिनेता सलमान खान आणि निर्मात-दिग्दर्शक करण जोहरला सिनेसृष्टीतील घराणेशाहीसाठी जबाबदार धरले जात आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर तुफान टीका होत असतानाच सलमान खानवर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ही संस्था पुढे सरसावली असून त्याचबरोबर आम्ही सलमान खानच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात FWICE ने एक पत्रक जारी करत सलमान खानचे त्यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर विरोधकांना इशारा दिला आहे. सिनेक्षेत्रातील कर्मचारी जेव्हा लॉकडाउनच्या काळात एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत होते तेव्हा आमच्या मदतीसाठी सलमान खानच धावून आला होता. आम्हाला त्याने आर्थिक मदत तर केलीच शिवाय जगण्यासाठी प्रेरणा देखील दिली. सध्याच्या घडीला सलमान खानवर जे आरोप होत आहेत, ते खोटे असून सलमानच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे या पत्रकामध्ये म्हटले आहे.

सलमान खानचे फॅन विरुद्ध टीकाकार अशी परिस्थिती FWICE ने जारी केलेल्या या पत्रकामुळे निर्माण झाली आहे. दरम्यान सलमान विरुद्ध सुरु असलेल्या ऑनलाईन पिटिशनवर आता पर्यंत 35 लाखांपेक्षा अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. यावरुनच सलमान विरुद्ध पेटलेला संताप आणखी वाढत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

Leave a Comment