सलग दुसऱ्या वर्षी राम कदमांचा दहिहंडी उत्सव रद्द


मुंबई – सध्याच्या घडीला देशासह राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहनही वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे.

दरम्यान काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने आखून दिलेले नियम मान्य करत, साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले आहे. पण गणेशोत्सवापूर्वी येणाऱ्या दहीहंडी उत्सवावरही सध्या कोरोनाचे सावट आहे. दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीला होणारी मोठी गर्दी पाहता आपला दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


राम कदम यांच्याकडून घाटकोपर परिसरात मोठ्या जोशात दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर अनेक गोविंदा पथके या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी येत असतात. पण यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहता राम कदम यांनी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची माहिती राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. कोरोनाचे संकट पाहता आणि दहीहंडीला हजारो लोकांची जमा होणारी गर्दी लक्षात घेता, घाटकोपरमघ्ये होणारी आमची देशातील सर्वात मोठी दहीहंडी यावर्षी जनहिताच्या दृष्टीने रद्द करण्यात येत असल्याचे राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान राम कदम यांनी मागच्या वर्षी देखील पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे राम कदम यांनी दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहनही केले होते.

Leave a Comment