E-School; शिक्षकांसाठी मुंबई महापालिकेची नियमावली


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये असलेला महाराष्ट्र आता अनलॉक होण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहे. पण शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तूर्तास तरी ऑनलाईनच शाळा उघडण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या आहेत. शिक्षकांनी शाळेत कसे आणि काय काम करायचे? तसेच, वर्क फ्रॉम होम कसे करायचे आणि नेमके काय करायचे, यासंदर्भात बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने काही आदेश जारी केले आहेत.

यामध्ये जरी शाळा प्रत्यक्षात सुरु झाल्या नसल्या तरी वेळेत शिक्षण आणि शैक्षणिक वर्ष सुरु करणे, तसेच विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित कसे ठेवता येईल, 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष आणि शिक्षण हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या.

स्थानिक आणि बदलत्या परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्यापूर्वी त्या-त्या जिल्ह्याच्या कोरोना आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका क्षेत्रांसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी शाळा प्रत्यक्ष केव्हा सुरु कराव्यात याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणासंदर्भातील सूचना

  • पालकांना शाळेत टप्प्या-टप्प्याने बोलावून आणि आवश्यक सुरक्षित अंतर शाळेमध्ये प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप ठेवून करावे.
  • जर पाठ्यपुस्तके काही विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीची पुस्तके देण्यात यावी.
  • पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेमध्ये पालकांना करावयाचे असल्याने गरजेनुसार मुख्याध्यापकांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास शिक्षकांना कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असेल.
  • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील आदेशापर्यंत म्हणजेच 30 जून 2020 पर्यंत ई-लर्निंग शैक्षणिक सुविधेनुसार घरात राहुनच ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यावे.
  • 15 जून ते 30 जून दरम्यान घरात राहून शिक्षण द्यायचे असल्याने शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद केली जाईल.

दरवर्षी शाळेचा 13 जूनला पहिला दिवस असतो. पण ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर यावेळी सगळे वेळापत्रकच बदलले. 15 जूनच्या मुहूर्तावर शैक्षणिक वर्ष सुरु झाले, खरे पण विद्यार्थ्यांनी नाही तर शिक्षकांना संगणकावर ‘एन्टर’चे बटण दाबून वर्च्युअल क्लासरुममध्ये हजेरी लावावी लागली.

देशासह राज्यभरातील इतर काही बोर्डाच्या शाळा यापूर्वीच उघडल्या असल्या तरी महाराष्ट्रात 15 जूनपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा सुरु झाली आहे. विद्यार्थांना ई-स्कूलमुळे शारीरिक ताण येण्याची शक्यता व्यक्त करत काही पालक आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता, पण विद्यार्थ्यांचे शिक्षण कुठल्याही परिस्थितीत थांबू नये, ही भूमिका घेत राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीने शाळांचे टाळे उघडले आहेत.

Leave a Comment