बहिष्कारानंतरही चिनी कंपनीचा लेटेस्ट मोबाइल काही मिनिटांमध्येच झाला ‘सोल्ड आउट’


नवी दिल्ली – देशभरातील विविध स्तरावर भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर अशा आशयाचे आवाहन सोशल मीडियावर केले जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट घडत असल्याचे दिसत आहे.

काल भारतात चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला होता. भारतीय ग्राहकांचा अ‍ॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच हा फोन ‘सोल्ड आउट’ झाल्याचे समोर आले आहे.

अ‍ॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर कालवन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी खास सेल आयोजित करण्यात आला होता. सेलला ठरल्यानुसार दुपारी 12 वाजता सुरूवात झाली, पण हा फोन अ‍ॅमझॉनच्या वेबसाइटवर काही मिनिटांमध्येच सोल्ड आउट झाला.

सेलमध्ये OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही होत्या. एसबीआयच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 3,000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळत होते. याशिवाय जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतच्या जिओ बेनिफिट्सची ऑफर होती. तसेच ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला होता.

एकीकडे पूर्व लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील देशभक्तांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना सेलमध्ये काही मिनिटांतच हा चिनी फोन विकला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Comment