श्रीलंकन क्रिकेटपटूंनी भारताला ‘विकला’ 2011 चा वर्ल्ड कप

श्रीलंकेने 2011चा एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना विकला होता, असा धक्कादायक आरोप श्रीलंकेचेच माजी क्रिडा मंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी केला आहे. 2011 वर्ल्ड कपवेळी ते क्रिडा मंत्री होती. महिंदानंदा अलुथगमगे असा दावा करणारे पहिलेच व्यक्ती नसून, या आधी श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी देखील हा सामना फिक्स असल्याचे म्हटले होते. एका वृत्त वाहिनीशी बोलताना अलुथगमगे म्हणाले की, आम्ही 2011 वर्ल्ड कपचा अंतिम सामना विकला होता.

अलुथगमगे हे 2010 ते 2015 या काळात श्रीलंकेचे क्रिडा मंत्री होते. आता ते अक्षय ऊर्जा आणि शक्ती राज्य मंत्री आहेत. त्यांनी सांगितले की, मला त्यावेळी हा खुलासा करायचा नव्हता. 2011 मध्ये आम्ही जिंकू शकलो असतो, मात्र आम्ही सामना विकला. मी आता याविषयी बोलू शकतो असे मला वाटते. मला खेळाडूंच्या बाबतीत म्हणायचे नाही, मात्र काही गट नक्कीच यात सहभागी होते.

मुंबईच्या वानखेडे येथे झालेल्या या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. या सामन्यात श्रीलंकेने 6 विकेट्स गमावत 50 ओव्हरमध्ये 274 धावा केल्या होत्या. यानंतर गौतम गंभीरची अर्धशतकीय खेळी आणि युवराज-धोनीच्या भागीदारीच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक सामना जिंकला होता.

दरम्यान, श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंवर भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेले आहे. मागील महिन्यात देखील श्रीलंकन बोर्डाने सांगितले होते की आयसीसी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खेळाडूंची चौकशी करत आहेत.

Leave a Comment