राजू शेट्टींमधला ‘स्वाभिमान’ जागला; राष्ट्रवादीची ऑफर नाकारली


कोल्हापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी राज्यपालांच्या कोट्यातून मिळणाऱ्या विधान परिषद जागेवरून भलतेच कोंडीत सापडल्याचे दिसत आहेत. त्यातच राजू शेट्टी दुरावलेल्या विरोधकांनी चालवलेले टीकेचे प्रहार आणि स्वकीयांनीच केलेले घाव, यामुळे व्यथित झाले आहेत. त्यातूनच आता त्यांनी आज विधान परिषदेची ब्यादच नको, असे म्हणत यावर चर्चा करायचे नाही असे स्पष्ट केल्यामुळे स्वाभिमानीतील विधानपरिषदचा गुंता आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

राजू शेट्टी यांनी याबाबत आज कोल्हापूर येथे एक पत्रक जारी करून विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय प्रवासाचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यातून त्यांनी आपली राजकीय भूमिका ही स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी याबाबत म्हणाले की, विधानपरिषदेच्या ज्या बारा जागांबाबत सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता.

राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन जर मी स्वत: उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नसल्याचे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. मी त्यांना आम्ही विचार करुन कळवतो असा निरोप दिला व राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना सांगितले. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले.

ही बैठक १२ जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी झाली. राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक,पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य या बैठकीस उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्विकारण्याचे ठरले. मी बैठकीला माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने जाणिवपुर्वक गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्याबाबत एकमत केले. तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. मी १६ जून रोजी तो निरोप घेऊन आघाडीचे नेते शरद पवार यांना पक्षाचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला.

आता माझ्या हेतूबद्दलच काही पदाधिकारी शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषदायक असल्याचे नमूद करून शेट्टी म्हणाले, मागील पंचवीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. मी आजपर्यंत अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, एवढ्या जखमा कधीच झाल्या नव्हत्या. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा येथील नाते घट्ट आहे. जर एका विधानपरिषदेच्या जागेमुळे नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच. हे सभागृह शेतक-यांचे प्रश्न मांडण्याचे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये विधानपरिषदेच्या जागेवरुन गैरसमज पसरवणे, मन दुरावणे योग्य नाही.

अनेकांनी स्वाभिमानी संपावी म्हणून देव पाण्यात घातले आहेत, ही त्यांना पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. ती कोणाच्या मायावी प्रयत्नाने संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको, असे वाटते. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment