मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अशा अचानक एक्झिटमुळे त्याच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर सोशल मिडियावरुन अनेक कलाकारांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. केवळ हिंदीच नाही तर प्रादेशिक भाषांमधील अनेक कलाकारांनी सोशल नेटवर्किंगवरुन सुशांतच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केला आहे. पण भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जीने एक पोस्ट शेअर करत सोशल मिडियावर अगदीच विचित्र पद्धतीने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या एका भोजपुरी कलाकाराला चांगलेच झापले आहे.
सुशांतच्या आत्महत्येवर बनवले भोजपुरी गाणे; नेटकऱ्यांनी झापले
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन राणी चॅटर्जीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो एका पोस्टरचा असून सुशांत सिंह राजपूतच्या निधनावर एका भोजपुरी गायकाने एक गाणे बनवल्याचे यामधून दिसत आहे. हे पोस्टर पाहून राणीचा पारा चांगलाच चढला आणि तिने हे गाणे बनवणाऱ्याला चांगलेच झापले आहे.
या लोकांनी लाज विकून खाल्ली की काय? थोडी तरी लाज अशा निर्ल्लज लोकांना वाटली पाहिजे. कधीही स्वत:च्या मेहनतीने नाव कमवा कोणाच्या मृत्यूचा फायदा घेऊन नाम कमवण्यात काय अर्थ आहे. असे लोक कलाकारांच्या नावावर डाग आहेत. आता यावर कोणी भोजपुरी कलाकार काहीही बोलणार नाही. अशा लोकांमुळेच भोजपुरी चित्रपट हा हास्याचा विषय बनला आहे. आपण शांत राहतो त्यामुळे या लोकांना प्रोत्साहन मिळते, अशा शब्दात राणीने आपला संताप व्यक्त केला आहे.
राणी चटर्जीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘सुशांत फसरी लगा लिहले’ असे शब्द असल्याचे गाणे बनवण्यात आल्याचे दिसून येत आहे. शैल सिंह संगम याने या गाण्याला आवाज दिल्याचेही पोस्टरमध्ये दिसत आहे.