व्हायरल; चीनी जवानांनी भारतीय जवानांवर हल्ला केलेल्या टोकदार लोखंडी रॉडचे फोटोज


नवी दिल्ली: सोमवारी भारतीय लष्कर आणि चीनी लष्करामध्ये गलवान खोऱ्यात जोरदार संघर्ष झाला. या घटनेनंतर आता चीनचा खरा चेहरा उघड झाला आहे. चीनी सैनिकांनी १५ जूनच्या रात्री भारतीय सैन्यावर हल्ला केला आणि त्यावेळी चीनच्या सैनिकांनी टोकदार लोखंडी रॉड, दगडांचा वापर करण्यात आला होता. भारतीय लष्कराचे 20 जवान अचानक झालेल्या या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर आता चीनच्या कुरापती आणि खरा चेहरा उघड करणारे फोटोज व्हायरल झाले आहेत.

भारतीय सैनिकांवर हल्ला करण्यासाठी चीनच्या सैनिकांनी टोकदार लोखंडी रॉडचा उपयोग केला होता. सोशल मीडियात त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन हे स्पष्ट होत आहे की, चीनचा हा एक पूर्वनियोजित कट होता. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये लोखंडी रॉडला टोकदार खिळे असल्याचे दिसत आहे. असे अनेक रॉड्स या परिसरातून जप्त करण्यात आले आहेत. यावरुन हे स्पष्ट होत आहे की, भारतीय भूमीवरुन मागे हटण्याची चीनची तयारी अजिबात नाही आणि हा एक पूर्वनियोजित कट होता.


भारत-पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या खोऱ्यात हल्ला करण्यासाठी अशाच प्रकारचे कृत्य पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून (बॅट) करण्यात येतात. बॅटचे सैनिक सीमा भागात येऊन अचानक हल्ला करतात, त्याचबरोबर शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करतात. वास्तविक १९९६ च्या करारा अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य भारत-चीन सीमेवर गोळीबार करू शकत नाहीत. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. पण, असे असतानाही भारतीय सैन्यावर चीनच्या सैन्याने वेगळ्या पद्धतीने हल्ला केला.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात भारताचे १८ जवान जखमी झाले आहेत. या जखमी सैन्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर भारतीय सैन्याने सुद्धा चीनच्या सैन्यावर हल्ला करत त्यांचे मोठे नुकसान केले आहे आणि त्यांचे ४० सैनिक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. पण, आपल्या सैनिकांबाबत चीनने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

Leave a Comment