खाकीतील देवदूत; 14 दिवसांच्या बाळाचे मुंबईतील पोलिसाने असे वाचवले प्राण

एका 14 दिवसांच्या बाळांचे प्राण वाचवणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले जात आहे. बाळाने नकळत सेफ्टी पिन गिळली होती. अशा स्थितीमध्ये कॉन्स्टेबल श्रीमंत कोळेकर देवदूत बनून मदतीला धावले. मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, कोळेकर यांनी स्वतःच्या गाडीने सेफ्टी पिन गळ्यात अडकलेल्या बाळाला हॉस्पिटलमध्ये पोहचवले. जेथे त्याच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.

मुंबई पोलिसांनुसार, कोळेकर यांनी बाळाच्या पालकांना रस्त्यावर पाहिले. बाळाच्या घशात सेफ्टी पिन अडकल्याचे समजताच कोळेकर यांनी क्षणाचाही विचार न करता त्वरित पालकांना परेल येथील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल येथे पोहचवले. यासाठी त्यांनी स्वतःच्या गाडीने पालकांना हॉस्पिटलमध्ये पोहचवले. कोळेकर यांच्या मदतीने वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहचल्यानंतर डॉक्टरांनी बाळावर इलाज केला.

सोशल मीडियावर मुंबई पोलिसांचे हे ट्विट व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला 3 हजारांपेक्षा जास्त युजर्सनी लाईक केले आहे. तर युजर्सनी यासाठी कॉन्स्टेबल कोळेकर यांचे कौतुक केले.

Leave a Comment