चीनला पहिला दणका; ‘या’ कंपनीला रद्द करावा लागला आजचा फोन लाँच इव्हेंट


नवी दिल्ली – फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या भारतातील लाँचिंगसाठी आयोजित केलेला लाइव्ह इव्हेंट चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने रद्द केला. 20 भारतीय जवान शहीद लडाखमध्ये झालेल्या हिंसेत झाल्यानंतर चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी भारतात जोर धरु लागल्यामुळे हा निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगितले जात आहे.

भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागल्यामुळे नवीन स्मार्टफोन लाइव्ह लाँच न करता कंपनीने केवळ एक 20 मिनिटांचा प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन ओप्पो Find X2 फोन भारतात लाँच केल्याची घोषणा केली. राऊटर्स या वृत्तसंस्थेने लाइव्ह लाँचिंगऐवजी केवळ व्हिडिओ का अपलोड करण्यात आला याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, त्यावर ओप्पोकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

गुरुवारी संध्याकाळी ओप्पो Find X2 स्मार्टफोन लाँच केला जाणार होता. हा डिव्हाइस कंपनीकडून संध्याकाळी 4 वाजता एका ऑनलाइन ओन्ली इव्हेंटमध्ये लाँच केला जाणार होता. युट्युबवर या कार्यक्रमाची लाइव्ह स्ट्रीमिंग होणार होती. पण आता युट्यूबवरुन ही लिंक गायब झाली आणि लाइव्ह लाँचिंग रद्द झाले.

कंपनीने लाइव्ह लाँचिंगऐवजी 20 मिनिटांचा एक प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ शेअर करुन भारतीय मार्केटमध्ये फोन उपलब्ध झाल्याची घोषणा केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ओप्पोने कशाप्रकारे भारतात मदत केली हे दखील या व्हिडिओमध्ये कंपनीने दाखवले आहे.

Leave a Comment