शहीद जवानांच्या घटनेवरुन राहुल गांधींचे मोदींवर ‘ट्विट बॉम्ब’


नवी दिल्ली : भारत-चीनच्या लष्करात लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यामुळे संपूर्ण देशात सध्या संतापाची लाट आहे. दरम्यान ही घटना घडल्याच्या दोन दिवसांनंतरही भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीव्यतिरिक्त केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारच्या एकाही मंत्र्यांनी याबाबत वक्तव्य केलेले नाही. त्यातच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधानांनी या घटनेवर मौन का बाळगले आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.


त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी अद्याप मौन का धारण केले आहे? ते देशापासून काय लपवत आहेत? आता पुरे झाले. नेमके काय चालले आहे हे आम्हाला कळायला हवे. आपल्या सैनिकांना मारण्याची, आपला प्रदेश बळकावण्याची चीनची हिंमतच कशी होते?


दरम्यान यापूर्वीही भारत-चीन सीमेवरील तणावावरुन राहुल गांधी यांनी ट्विट केले आहेत. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक बातमी शेअर करताना लिहिले आहे की, लडाखमधील आपल्या क्षेत्रावर चीनने घुसखोरी करुन ताबा मिळवला आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन धारण करुन बसले आहेत.


राहुल गांधी यांनी त्याआधी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना थेट प्रश्न विचारला होता. संरक्षण मंत्र्यांचे हाताच्या चिन्हावर भाष्य करुन झाले असेल तर ते चीनने लडाखमधील भारतीय क्षेत्र व्यापले आहे का? याचे उत्तर देणार का असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता.


त्याचबरोबर सीमेच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी शायरीचा आधार घेतल सरकारवर टीका केली होती. “सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।”, असे ट्विट केले होते.

Leave a Comment