लडाखमध्ये जे काही घडले त्यासाठी नेहरु, गांधी परिवाराला जबाबदार धरू शकत नाही


मुंबई – सोमवारी रात्री भारत-चीन या दोन्ही देशातील सैन्य दलांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या झडपीत २० भारतीय जवान शहीद झाले. दरम्यान देशभरात या घटनेनंतर चीनबद्दल संतापाची भावना व्यक्त केली जाता आहे. तसेच विरोधकांसह देशातील जनता मोदी सरकारला सीमेवर काय घडले याबद्दल प्रश्न विचारत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल भूमिका मांडली. लडाखमधील सीमेवर जे काही घडले, त्यासाठी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधींना आपण जबाबदार धरू शकत नसल्याचे मत त्यांनी मांडले.


सोमवारी रात्री भारत-चीन दरम्यान सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनने आगळीक करून भारतीय जवानांवर हल्ला केला. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार त्यात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४३ सैनिक ठार झाले आहेत. ही झडप १४ हजार फूट उंचीवरच्या या भागात गलवान नजीक झाली. या घटनेवरून आता देशातील राजकारण चांगलेच तापले आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत सीमेवर झालेल्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाले, जे काही लडाखमधील सीमेवर घडले, त्यासाठी आपण जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी वा राहुल गांधी यांना जबाबदार धरू शकत नाही. २० जवान शहीद झाले, त्यासाठी आपण सर्व जबाबदार आहोत. जो काही निर्णय पंतप्रधान घेतील, त्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील. पण, चुकीचे काय झाले हे त्यांनी देशातील जनतेला सांगायला हवे, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.


त्याचबरोबर ट्विटरद्वारेही काही प्रश्न संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत. चीनकडून होणाऱ्या घुसखोरीला कधी चोख प्रत्युत्तर देणार आहात आहे? गोळीबार न होता आपले २० जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर आपण काय केले? या दरम्यान चीनचे किती सैनिक मारले गेले? भारताच्या हद्दीत चीन घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचे आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात… तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद,” असे ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment