केआरकेने उघड केली सुशांत बॅन केलेल्या प्रोडक्शन हाऊसची नावे


रविवारी मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर हिंदी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला. सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगणा राणावतने देखील एक व्हिडीओ शेअर करत बॉलिवूडमधील कंपूशाही तसेच घराणेशाहीवर निशाणा साधला होता. त्यानंतर या वादात अनेकांनी उडी घेतल्याचे पाहायला मिळाले. यातच बॉलिवूड कलाकारांवर स्वयंघोषित सिनेसमीक्षक कमाल राशिद खान याने निशाणा साधला आहे. काही महिन्यांपूर्वीच सुशांतचं करिअर संपले असल्याचे केआरकेने म्हटले आहे. त्याचबरोबर कोणत्या कंपन्यांमुळे सुशांतचे करिअर उद्धवस्त झाले त्याचादेखील खुलासा केला आहे.


बॉलिवूडवर ठराविक ६ कंपन्यांचे वर्चस्व आहे. त्यांना एखादी व्यक्ती जर आवडत नसेल तर ते त्याचे करिअर उद्धवस्त करुन टाकतात, असे आपल्या ट्विटमध्ये केआरकेने म्हटले आहे. त्याचबरोबर काही प्रोडक्शन हाऊसची नावेही त्याने दिली आहेत. यात धर्मा प्रोडक्शन (करण जोहर), यशराज फिल्म्स (आदित्य चोप्रा), टी-सीरिज(भूषण कुमार), बालाजी प्रोडक्शन( एकता कपूर), नाडियाडवाला ग्रँड सन्स (साजिद नाडियाडवाला) आणि सलमान खान फिल्म, या कंपन्यांची नावे केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये दिली आहेत.


विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी कमाल आर खानने सुशांतच्या करिअरविषयी एक ट्विट केले होते. ते ट्विट आता पुन्हा चर्चेत आले आहे. त्यात त्याने सुशांतला या सहा कंपन्यांनी बॅन केल्याचे म्हटले होते. अनेक कलाकारांचे आयुष्य याच प्रोडक्शन हाऊसमुळेच उद्धवस्त झाले आहे. त्याचबरोबर सुशांत सिंहलादेखील याच कंपन्यांनी बॅन केले होते. असे फेब्रुवारीमध्ये ट्विट करुन केआरकेने सांगितले होते.

Leave a Comment