नेपाळ आणि भारतात मागील काही दिवसांपासून सीमावादामुळे तणाव निर्माण झाला आहे. असे असले तरी भारताने नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिर परिसरात 2.33 कोटी रुपये खर्च करून स्वच्छता केंद्राचे निर्माण करण्याचे वचन दिले आहे. भाविकांसाठी या पवित्रस्थळी पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्वच्छता केंद्राचे निर्माण केले जाईल. या योजनेचे निर्माण ‘नेपाळ-भारत मैत्री विकास भागीदारी’ या अंतर्गत होणार आहे.
सीमावादानंतरही नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरासाठी भारत देणार 2.33 कोटी रुपये

पशुपतिनाथ मंदिरात स्वच्छता केंद्राच्या बांधकामासाठी भारतीय दूतावास, नेपाळचे फेडरल अफेयर्स मंत्रालय, सामान्य प्रशासन आणि काठमांडू महानगर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात देखील समावेश आहे.

भारताने या योजनेसाठी 3.72 कोटी नेपाळी रुपये (जवळपास 2.33 कोटी रुपये) आर्थिक मदत देणार असल्याचे म्हटले आहे. पुढील 15 महिन्यात याची निर्मिती होईल. पशुपतिनाथ मंदिर हे नेपाळमधील सर्वात मोठे मंदिर आहे व हे बागमती नदीच्या दोन्ही बाजूला पसरले आहे. नेपाळ आणि भारतातील हजारो भाविक दररोज येतात.