चीनला जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम - नरेंद्र मोदी - Majha Paper

चीनला जशास तसे उत्तर देण्यास भारत सक्षम – नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – चीन लष्कराच्या जवानांसोबत झालेल्या भारतीय सैनिकांच्या चकमकीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींची देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. मोदींनी त्यापूर्वी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

चीनला रोखठोक इशारा देत, भारत जशास तसे उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचे नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले. लढता लढता भारताचे वीर जवान शहीद झाले आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान तर आहेच, पण हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे मोदी म्हणाले आहेत. मी सर्व देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आमच्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्हाला कुणीही थांबवू शकत नाही, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

1962 साली या परिसरात 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केले.

Leave a Comment