देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; बाधितांची संख्या 3.54 लाखांवर


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा फार्स दिवसेंदिवस देशाभोवती घट्ट आवळला जात आहे. त्यातच या रोगामुळे बळी गेलेल्यांची देशभरातील संख्या 11 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. काल दिवसभरात एकूण 2003 जणांची कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राने काल 1328 मृत्यूंची तर दिल्लीने 344 मृत्यूंची नोंद केल्याने देशातील मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 24 तासात 10 हजार 974 ने वाढ झाली तर देशभरात आजपर्यंत कोरोनामुळे 11903 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, 3 लाख 54 हजार 065 वर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला आहे. त्यापैकी एकूण 1 लाख 86 हजार 935 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 52.79टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 55 हजार 227 एवढे रुग्ण आहेत. मागील 24 तासांत 6 हजार 922 रुग्ण बरे झाले आहेत. देशात 3 तारखेला अनलॉक झाल्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत 1 लाख 46 हजार 450 ची वाढ झाली आहे तर मृतांची संख्या 4 हजार 416 ने वाढली आहे.

दरम्यान देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रात काल 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, तसेच आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा वेग वाढताना दिसत आहे. काल कोरोनाच्या 2701 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 13 हजार 445 एवढा झाला आहे. पैकी सध्या 50 हजार 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Leave a Comment